नेते सहलीवर;जनता वार्‍यावर !

Foto

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सिडको, हडको, गारखेडा आदी भागात पाणीप्रश्‍न चांगलाच पेटत चालला आहे. अनेक भागात पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, महापालिका पदाधिकारी व प्रशासन मात्र पाणीप्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर बरेच राजकीय नेते सहलीवर गेले असून, इकडे सर्वसामान्य जनतेचे पाण्यासाठी हाल होत आहेत. आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विश्रांतीनगर, भारतनगर व परिसरातील महिलांनी सिडको एन-5 येथील जलकुंभ गाठून पाण्यासाठी पैसे घेता मग टँकरने पाणीपुरवठा का करत नाही? असा सवाल तेथील सुरक्षारक्षकांना केला. जायकवाडी धरणातून शहरात येणारे पाणी 20 एमएलडीने कमी झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, सिडको, हडकोसह अनेक वसाहतींमध्ये तर आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिक अत्यंत संतप्‍त झाले आहेत. गेल्या काही दिवसात पाण्याकरिता टँकर अडवणे, जलकुंभावर आंदोलन करणे, असे प्रकार  पहायला मिळाले.
पैसे घेता, मग टँकर का देत नाही? 

 गेल्या आठ दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या विश्रांतीनगर व भारतनगर परिसरात आज पाण्याचे टँकर आलेच नाही. त्यामुळे आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या भागातील संतप्‍त महिलांनी थेट सिडको एन-5 येथील जलकुंभ गाठले. यावेळी तेथे उपस्थित सुरक्षारक्षकांना संतप्‍त महिलांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पैसे घेतात मग पाणीपुरवठा का करत नाही? असा सवाल केला. भारतनगर येथे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पैसे प्रशासन घेते आणि प्रत्यक्षात मात्र चार-पाच दिवसात पाणीपुरवठा करते, असेही काही महिलांचे म्हणणे होते. याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला असता, पैसे परत घेऊन जा, असे उलट उत्तर अधिकारी देत असल्याचे महिलांनी सांगितले.